नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष तीव्र झाला. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले खरे, मात्र त्यांचा स्वपक्षीय नेत्यांसोबतच सामना रंगू लागला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर बंडखोरांविरोधात बोलताना शेलक्या शब्दांत निशाणा साधला. राऊत यांच्या या टीकेने घायाळ झालेल्या बंडखोर आमदारांनी थेट विधिमंडळातूनही आपला राग व्यक्त केला. आज मात्र नवी दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देण्याचं टाळलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल एक वक्तव्य केलं आहे, तसंच विधिमंडळात शिंदे आणि फडणवीस यांच्यात समन्वय दिसून आला, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असे काही प्रश्न पत्रकारांकडून संजय राऊत यांना विचारण्यात आले. हे प्रश्न विचारताच संजय राऊत हे काहीसे संतापल्याचं पाहायला मिळालं. ‘मी अशा प्रश्नांना उत्तर देणार नाही, आता नव्या सरकारचं बहुमत सिद्ध झालं आहे, त्यामुळे तो विषय आमच्यासाठी संपला आहे, काही महत्त्वाचं असेल तर विचारा,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीची बातमी चुकीची; काही माध्यमांनी दिली होती भेटीची बातमी
ईडीच्या प्रश्नावर उत्तर देत भाजपवर साधला निशाणा
एकनाथ शिंदे यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देण्याचं टाळणाऱ्या संजय राऊत यांनी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मात्र प्रतिक्रिया दिली आहे. ‘बंडखोर आमदार सत्तेत सहभागी झाल्याने त्यांना ईडीकडून दिलासा मिळत आहे. नुकताच एकाला जामीन मिळाल्याचं मी पाहिलं. या लोकांवर चुकीचे आरोप झाले होते. खासदार भावना गवळी यांच्या एका निकटवर्तीयाला जामीन मिळाला आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे, मात्र याचं जे टायमिंग आहे ते गमतीशीर आहे,’ असा टोला राऊत यांनी लगावला आहे.