गोंदिया, दि.9 : देशात व राज्यात ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया पर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोलीला सुद्धा घेऊन जाणार आहोत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिक्षण महर्षी स्व. मनोहरभाई पटेल जयंती व सुवर्ण पदक वितरण समारोह कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार विजय दर्डा, उद्योगपती सज्जन जिंदल व अभिनेते जॅकी श्राफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, आमदार विनोद अग्रवाल, मनोहर चंद्रिकापुरे, राजू कारेमोरे, विजय रहांगडाले, सहेसराम कोरेटे व गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती वर्षा पटेल प्रामुख्याने उपस्थित होत्या.
गडचिरोलीला स्टील हब ऑफ इंडियाच्या रूपाने विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून गुंतवणूक सुद्धा येत आहे. केवळ निर्यातच नाही तर उत्पादन सुद्धा गडचिरोलीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमचे सरकार ज्या प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे त्याचाच एक भाग म्हणून समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया पर्यंत केला जाणार आहे. नागपूर ते गोंदिया हे अंतर केवळ एका तासाचे असणार आहे. समृद्धी महामार्ग आम्ही गडचिरोलीला सुद्धा घेऊन जाणार आहोत. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर व वर्धा लॉजिस्टिक कॉरिडॉर तयार करण्यात येणार असून याचा खूप मोठा फायदा धान उत्पादक व निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने बोनस दिला असून यापुढे जाऊन धान उत्पादक शेतकरी जागतिक पुरवठा साखळीचा भाग व्हावा यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करावे लागतील असे श्री. फडणवीस म्हणाले. आम्ही जी व्यवस्था निर्माण करीत आहोत ती निश्चितपणे यासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मनोहरभाई पटेल यांनी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कार्य केले आहे. ज्यावेळी केवळ सहा ते दहा टक्के लोक साक्षर होते त्या काळात समाजाला पुढे न्यायचे असल्यास शिक्षणाची व्यवस्था करावी लागेल या ध्येयाने एकाच वेळी बावीस शाळा व दोन महाविद्यालय सुरू करून त्यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच आज एक संपूर्ण पिढी शिक्षित झाली असल्याचे श्री. फडणवीस म्हणाले. मनोहरभाई पटेल यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले झाले असून या परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून एकविसाव्या शतकातील विकसित देश म्हणून भारत पुढे येत आहे. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर येणार आहोत. जगातील सर्वात चांगली अर्थव्यवस्था बनायचे असेल तर सर्वात महत्त्वाचे असते ते मनुष्यबळ आणि हे केवळ शिक्षण व कौशल्याच्या माध्यमातूनच तयार होते. या आधारेच आज आपल्याला जागतिक दर्जाचे मनुष्यबळ तयार करण्याची दार खुली झाली आहेत असे त्यांनी सांगितले.
गावातील मुलांना उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण त्यांच्याच भाषेत घेण्याची सवलत केंद्र सरकारने दिली आहे असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण लवकरच मराठी भाषेत सुरू करणार आहे. याचा अर्थ इंग्रजीचे महत्त्व कमी करणे नसून जी मुलं केवळ इंग्रजी येत नाही म्हणून उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण मिळणार आहे. यामुळे येणाऱ्या दिवसात देशाच्या मनुष्यबळ निर्मितीत सर्वात मोठे योगदान गावखेड्यातून आलेल्या तरुणाईचे असेल असेही त्यांनी सांगितले.
येत्या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्यासाठी उद्योगपती सज्जन जिंदल यांनी एक मोठा कारखाना या भागात उभारावा व दोन्ही जिल्ह्यातील युवकांची बेरोजगारी दूर करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गोंदिया येथे विमानतळ असून फ्लाईंग स्कुल असल्यामुळे प्रशिक्षण घेऊन पायलट तयार होतात. त्यामुळे देशात गोंदिया जिल्ह्याचा नावलौकीक आहे. येत्या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात एक मोठा कारखाना उभारण्यात येईल असे आश्वासन उद्योगपती सज्जन जिंदल यांनी यावेळी दिले.
स्व.मनोहरभाई पटेल हे एक सामान्य घराण्यातून होते. 1950 मध्ये भंडारा जिल्ह्यात शिक्षण व सिंचनाची पाहिजे त्या प्रमाणात सुविधा नव्हती. त्या काळात मनोहरभाईंनी भंडारा जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात व सिंचनासाठी आपले योगदान दिले. आजचे गुणवंत विद्यार्थी हे देशाचे आदर्श आहेत, असे विजय दर्डा यांनी सांगितले.
9 फेब्रुवारी ही स्व.मनोहरभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. योगायोग असा की 9 फेब्रुवारी हा माझ्या वडिलांचा सुध्दा वाढदिवस आहे. विद्यार्थ्यांनी खुप परिश्रम घेऊन अभ्यास करावा. आपले आरोग्य सृदृढ राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज सकाळी योगा केला पाहिजे. लग्न करणाऱ्या जोडप्यांनी पहिले आपली रक्त तपासणी केली पाहिजे. एक-दुसऱ्यांचा मान-सन्मान केला पाहिजे. देशाची सेवा करण्यासाठी युवकांनी आपले योगदान दिले पाहिजे, असे अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी यावेळी सांगितले.
स्व.मनोहरभाई पटेल यांनी एकाच दिवसात 22 शाळा सुरु केल्या व जिल्हा परिषदेला दान दिल्या. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपला भक्कम पाया रोवलेले स्व.मनोहरभाई पटेल यांचे कार्य प्रेरणादायी आहे. आदिवासी अति दुर्गम भागात प्रत्येकाला शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाते. गोंदिया व भंडारा जिल्ह्यासाठी स्व.मनोहरभाईंनी अविरत प्रयत्न केले. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. आपल्याला विदर्भाचा विकास करायचा आहे, त्यामुळे आपण सर्वजन एकत्र येऊन विदर्भाचा विकास करुया असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
यावेळी सत्यार्थ-बोध ग्रंथाचे विमोचन प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट पत्रकारितेसाठी देशोन्नतीचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी चेतन भैरम, नवभारतचे जिल्हा प्रतिनिधी स्व.रमणकुमार मेठी, समाजसेवेमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जुगलकिशोर अग्रवाल, ललित थानथराटे, देवेश मिश्रा. इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये उत्कृष्ट कार्य करणारे हरिष मोटघरे (गोंदिया) व शमशीर अब्दुल वहाब खान (भंडारा). जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी टिकाराम गहाणे, स्वप्नील नंदनवार. उत्कृष्ट खेळाडू जान्हवी रंगनाथन, ज्योती गडेरिया यांचा स्वर्णपदक व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार माजी आमदार राजेंद्र जैन यांनी मानले.

Author: GB News



